Flipkart Food : भारताच्या ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्ट आता तुम्हाला घरपोच जेवण पोहचवणार आहे. झोमॅटो आणि स्विगी या दोन बड्या कंपन्यांचे वर्चस्व असलेल्या 'ऑनलाइन फूड डिलिव्हरी' बाजारपेठेत फ्लिपकार्ट लवकरच एन्ट्री करणार आहे. मे-जून महिन्यात बेंगळुरूमध्ये या सेवेचा पायलट प्रोजेक्ट सुरू होणार असून, २०२६ च्या अखेरीस ही सेवा देशभरात विस्तारण्याचे कंपनीचे नियोजन आहे.
फ्लिपकार्टचा दुसरा प्रयत्न; रणनीती बदलली!
दोन वर्षांपूर्वी फ्लिपकार्टने 'ONDC' (Open Network for Digital Commerce) च्या माध्यमातून या क्षेत्रात येण्याचा विचार केला होता, मात्र तो यशस्वी झाला नाही. आता कंपनी स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरून थेट फूड डिलिव्हरी सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. वाढत्या स्पर्धेमुळे आणि ग्राहकांच्या गरजांमुळे कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे.
का वाढतेय फूड डिलिव्हरीची ओढ?
- भारताची फूड डिलिव्हरी मार्केट २०२५ मधील ९ अब्ज डॉलरवरून २०३० पर्यंत २५ अब्ज डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज आहे.
- ई-कॉमर्समधील खरेदी अधूनमधून होते, पण जेवण ऑर्डर करणे ही लोकांची रोजची गरज बनली आहे. यामुळे फ्लिपकार्टच्या ॲपवर ग्राहकांची वर्दळ वाढेल.
- फ्लिपकार्टकडे आधीच करोडो ग्राहक आहेत, त्यांना नवीन सेवेशी जोडणे कंपनीसाठी सोपे जाईल.
फ्लिपकार्टचे 'बळ' काय?
फ्लिपकार्ट सध्या आपल्या क्विक कॉमर्स सेवेअंतर्गत ८०० हून अधिक 'डार्क स्टोअर्स' चालवत आहे. कंपनीचे वितरण जाळे अत्यंत भक्कम आहे, ज्याचा फायदा गरम अन्न वेळेवर पोहोचवण्यासाठी होईल. फ्लिपकार्ट लवकरच आपला आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. अशा वेळी आपला व्यवसाय विस्तारणे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल.
झोमॅटो आणि स्विगीसमोर मोठे आव्हान
सध्या भारतीय बाजारपेठ या दोन कंपन्यांच्या हातात आहे. फ्लिपकार्टकडे स्वतःचे मोठे रेस्टॉरंट नेटवर्क आणि मायक्रो-वेअरहाऊस सुविधा असल्याने झोमॅटो-स्विगीच्या वर्चस्वाला तडा जाण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांना सवलती आणि दर्जेदार सेवा मिळण्याची चिन्हे आहेत.
